The Department of Marathi was established in 1958. The Department is situated in the main Humanities building on an 610.59 Sq.m. built up area located in Mahatma Jyotiba Phuley Campus, Amaravati Road, Nagpur.
Dr. Shailendra Dharmdas Lende isthe present Professor & Head of the Department. The Department has cherished history of distinguished scholars heading the Department which included Prof. B.S. Pandit, Dr. A.N. Deshpande, Dr. V.B. Prabhudesai, Dr. D.B. Kulkarni, M.S. Wabgaonkar, Dr. Y.R. Manohar, Dr. M.P. Kulkarni,Dr. Akshaykumar Kale and Dr. Pramod Munghate. The Marathi Department, thus, has a cherished history of distinguished faculties who were scholars in their own right. Due to its strong academic tradition and research culture the Department has a respectable place and nature throughout Maharashtra.
The Department through its research critiques and literary essays have generated methodological parameter and approaches and added to the existing knowledge in the subject of old and medieval literature, Modern Poetry, Contemporary Marathi Literature, New literary trends etc. Rare combination to academic and administrative excelience is a major strength of the Department. The faculty members are well-known in the over Maharashtra in the various areas of Marathi literature, social & cultural field. The Marathi Department has been conducting full time M.A. course since its inception. Ph.D. research is also conducted in the Department on part time basis. During the academic period starting from 1981-82 to 2000-2001. The Department at present is offering M.A. and part time, Full time Ph.D. Programme.
स्नातकोत्तर मराठी विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
शतकोत्तरी इतिहास
सन १९२३ मध्ये नागपूर विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर नागपूर येथील हिस्लॉप कॉलेजमध्ये जून १९२७ पासून मराठी विषयातील बी. ए. चे आणि १९२८ पासून मॉरीस कॉलेज येथे एम. ए. वर्ग सर्वप्रथम सुरू झाले. प्रारंभी नागपुरातील मॉरीस कॉलेज, हिस्लॉप कॉलेज व सिटी बिंझाणी कॉलेज या तीन ठिकाणी एम. ए. मराठीचे वर्ग विभागून घेण्यात येत असत. पुढे जून १९५८ पासून विद्यापीठाने विद्यापीठात ‘स्नातकोत्तर मराठी विभाग’ स्वतंत्र स्वरूपात स्थापन झाले. त्यामुळे संपूर्ण विदर्भवासीयांना मराठी विषयामध्ये एम. ए. चे शिक्षण घेण्याची संधी मिळाली. मराठी कवितेचे प्रसिद्ध अभ्यासक प्रा. भ. श्री. पंडित हे या विभागाचे पहिले विभागप्रमुख म्हणून दि २० जून १९५९ रोजी रुजू झाले. त्यानंतर व्यासंगी अभ्यासक प्रा. म. शं बावगावकर, भाषाविज्ञानाचे जाणकार डॉ. वि. बा. प्रभुदेसाई आणि रसज्ञ समीक्षक प्रा. द. भि. कुलकर्णी हे विभागात रुजू झाले. या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे अल्पावधितच मराठी भाषा व साहित्याच्या अध्ययनाचे, अध्यापनाचे व संशोधनाचे महाराष्ट्रातील अग्रगण्य केंद्र अशी ख्याती या विभागाला प्राप्त झाली.
मराठी साहित्याच्या समग्र इतिहासाचे लेखक डॉ. अ. ना. देशपांडे हे १९६८ पासून विभागात प्राध्यापक व प्रमुख म्हणून रुजू झाले. त्यानंतर १९७० मध्ये संशोधक डॉ. म. रा. जोशी हे रुजू झाले. डॉ. अ. ना देशपांडे यांच्या निवृत्तीनंतर डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांनी १९७६ ते १९९२ ह्या प्रदीर्घ कालखंडात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्य केले. त्यानंतर १९७९ मध्ये प्रसिद्ध कवी व समीक्षक डॉ. यशवंत मनोहर यांची नियुक्ती झाली. पुढे १९८५ मध्ये समीक्षक डॉ. आशा सावदेकर ह्या रूजू झाल्या. मराठी विभागाच्या स्थापनेपासूनच्या चार दशकांच्या कालखंडामध्ये प्रा. भ. श्री. पंडित, डॉ. अ. ना. देशपांडे, प्रा. म. शं. बावगावकर, डॉ. वि.बा. प्रभुदेसाई, डॉ. द. भि. कुलकर्णी,डॉ. म. रा. जोशी, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. आशा सावदेकर या सर्व प्राध्यापकांनी स्नातकोत्तर मराठी विभागाचा नावलौकिक सर्वदूर पोचवला. विशेषतः डॉ. द. भि. कुलकर्णी आणि डॉ. यशवंत मनोहर यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या विभागासंबंधी एक अनन्यसाधारण असे वलय निर्माण केले.
सन १९९६ पासून मराठी साहित्याचे अभ्यासक डॉ. मदन कुलकर्णी हे विभागामध्ये प्राध्यापक म्हणून तर अर्वाचीन मराठी काव्याचे समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे हे प्रपाठक म्हणून रुजू झाले. डॉ. मदन कुलकर्णी यांच्या निवृत्तीनंतर डॉ. अक्षयकुमार काळे यांनी २००१ ते २०१५ या प्रदीर्घ कालखंडात प्रमुखपद सांभाळले. दरम्यान २००४ पासून डॉ. शैलेंद्र लेंडे हे विभागात अधिव्याख्याता म्हणून तर २०१३ पासून आधुनिक मराठी साहित्याचे समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे हे प्रपाठक पदावर रुजू झाले.
सद्यःस्थितीत मराठी विभागामध्ये डॉ. प्रमोद मुनघाटे हे प्राध्यापक व मराठी विभागप्रमुखपदावर कार्यरत आहेत व डॉ. शैलेंद्र लेंडे हे प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. विभागातील प्राध्यापक अध्ययन, अध्यापन, लेखन व संशोधनकार्याबरोबरच विविध प्रकारच्या साहित्यिक-सामाजिक-अकादमीक-सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर आहेत. सद्यःस्थितीमध्ये विभागात ९५ विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेतअसून त्यांना विभागाच्या ऐतिहासिक ज्ञानपरंपरेचा वारसा जतन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. स्नातकोत्तर मराठी विभाग संशोधन केंद्रावर ७१ विद्यार्थी पीएच. डी. साठी संशोधनकार्य करीत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संशोधन शिष्यवृत्ती व युजीसी-कनिष्ठ संशोधन छात्रवृत्ती यांच्या अंतर्गत देखील विभागात विद्यार्थ्यांचे संशोधनकार्य सुरू आहे.
विद्यापीठस्तरावरील पदव्युत्तर मराठीच्या अध्ययन, अध्यापन व संशोधनप्रक्रियेमध्ये मराठी विभागाची भूमिका मौलिक स्वरूपाची राहिलेली आहे. अध्ययन व अध्यापनाच्या क्षेत्रात विभागाने मागील सहा दशकांच्या कालखंडात केवळ विद्यापीठ पातळीवरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या विभागाने महाराष्ट्राला उत्कृष्ट व नामवंत प्राध्यापक तर दिलेच, पण त्याचबरोबर उत्कृष्ट विद्यार्थी देखील दिलेले आहेत. संशोधनाच्या क्षेत्रात देखील विभागाचे योगदान उल्लेखनीय स्वरूपाचे राहिलेले आहे. विद्यापीठामध्ये मराठी विषयात आतापर्यंत झालेले संशोधन हे बहुतांशपणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या संशोधन केंद्रातून पार पडलेले संशोधन आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आजतागायत झालेले संशोधन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले संशोधन-मागदर्शक व संशोधक हे विद्यापीठ परिक्षेत्रातील मराठीच्या संशोधनाकरिता उपकारक ठरलेले आहेत. पदव्युत्तर पातळीवरील मराठीच्या अभ्यासक्रमाच्या निर्धारणामध्ये मराठी विभागाचा व विभागातील प्राध्यापकांचा वाटा मूलभूत स्वरूपाचा ठरलेला आहे.बदलत्या काळातील आव्हानांना समजून घेत पदव्युत्तर अभ्यासक्रमाला कालसुसंगत व समयोचित करण्यासाठी विभाग सतत प्रयत्नशील राहिलेला आहे.
मराठी भाषा व साहित्य यांचा उच्चस्तरीय व सर्वांगीण अभ्यास करण्याच्या दृष्टीने स्थापण्यात आलेला विद्यापीठाचा हा स्नातकोत्तर मराठी विभाग आजमितीस साठाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. मराठी विभागाची ही मागील सहा दशकांपासून सुरू असलेली वाटचाल मराठी भाषा, मराठी साहित्य व मराठी संस्कृतीला समृद्ध करणारी आहे. विभागाच्या प्रारंभापासून विभागाला अध्ययन, अध्यापन, लेखन व संशोधनाची फार मोठी परंपरा राहिलेली आहे. प्रा. भ. श्री. पंडित, डॉ. अ. ना. देशपांडे, प्रा. म. शं. वाबगावकर, डॉ. वि. बा. प्रभुदेसाई, डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ. म. रा. जोशी, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. आशा सावदेकर, डॉ. मदन कुलकर्णी, डॉ. अक्षयकुमार काळे हे मातब्बर प्राध्यापक व संशोधक विभागाला लाभले. मराठी विभागामध्ये कार्य केलेल्या ह्या सर्वच प्राध्यापकांनी मराठी भाषा व साहित्याच्या विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला आहे. डॉ. भ. श्री. पंडित, डॉ. अ. ना. देशपांडे यांचेपासून तर डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. प्रमोद मुनघाटे यांचेपर्यंतची मराठी विभागातील अध्यापकीय व संशोधकीय परंपरा ही एक समृद्ध, ऐतिहासिक आणि सातत्यपूर्ण स्वरूपाची परंपरा राहिलेली आहे.
मराठी विभागामध्ये आतापर्यंत झालेले मराठी भाषा व साहित्यविषयक संशोधन आणि लेखन हे मोठे मौलिक स्वरूपाचे राहिलेले आहे. या संशोधनाची व्याप्ती देखील प्राचीन-मध्ययुगीन साहित्यापासून सर्वसमावेशक व विविधविषयस्पर्शी राहिलेली आहे. विभागातील जुन्या, मधल्या व अलीकडच्या काळातील प्राध्यापकांनी प्राचीन-मध्ययुगीन-अर्वाचीन साहित्य, प्राचीन व अर्वाचीन साहित्येतिहास, संत साहित्य व पंत साहित्य, प्राचीन कविता, आधुनिक कविता, साहित्यशास्त्र व काव्यशास्त्र, अर्वाचीन साहित्यप्रकार, भाषाविज्ञान, समकालीन साहित्य, ग्रामीण साहित्य, आंबेडकरवादी साहित्य, नवे साहित्यप्रवाह इत्यादी विविधांगी साहित्यक्षेत्रांमध्ये मूलभूत स्वरूपाचे संशोधन आणि लेखन केले आहे. विभागातील बहुतांश प्राध्यापकांनी कविता या साहित्यप्रकाराच्या संबंधात बहुतांशपणे लेखन व संशोधन केल्याची एक विशेष बाब देखील लक्षात येते. काव्याभ्यासाच्या क्षेत्रातील प्रा. भ. श्री. पंडित यांची कामगिरी, वाङ्मयेतिहासलेखनाच्या क्षेत्रातील डॉ. अ. ना. देशपांडे यांची कामगिरी, प्राचीन-अर्वाचीन साहित्याभ्यासाच्या क्षेत्रातील प्रा. म. शं. वाबगावकर यांची कामगिरी, भाषिक अभ्यासकाच्या क्षेत्रातील डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांची कामगिरी, आस्वादक व कलात्मक समीक्षालेखनाच्या क्षेत्रातील डॉ. द. भि. कुलकर्णी यांची कामगिरी, सौंदर्यभावी समीक्षाक्षेत्रातील डॉ. आशा सावदेकर यांची कामगिरी, प्राचीन मराठी साहित्यसंशोधनाच्या क्षेत्रातील डॉ. म. रा. जोशी यांची कामगिरी, काव्यनिर्मितीच्या क्षेत्रातील व आंबेडकरवादी वैचारिकतेच्या क्षेत्रातील डॉ. यशवंत मनोहर यांची कामगिरी, प्राचीन-अर्वाचीन साहित्यसंशोधनातील डॉ. मदन कुलकर्णी यांची कामगिरी अर्वाचीन काव्यसमीक्षेच्या क्षेत्रातील डॉ. अक्षयकुमार काळे यांची कामगिरी सर्वपरिचित स्वरूपाची आहे. विभागातील प्राध्यापकांनी मराठी साहित्यासंबंधी जसे संशोधकात्मक व समीक्षापर लेखन केले, तसेच त्यांनी अनेकानेक संशोधकांना, समीक्षकांना व विद्यार्थ्यांना छानपैकीघडविलेले आहे. मराठी विभागातील आतापर्यंतच्या सर्वच प्राध्यापकांच्या अध्यापन, लेखन, समीक्षण व संशोधनाच्या पाठबळावर विभागातील विद्यार्थ्यांच्या पिढ्या सतत पोसल्या गेल्या आहेत.
या मराठी विभागाला जशी नामवंत व कीर्तिवंत प्राध्यापकांची परंपरा लाभलेली आहे, त्याचप्रमाणे नावाजलेल्या विद्यार्थ्यांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. शैक्षणिक व वाङ्मयीन क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या अशा विभागाच्या माजी विद्यार्थ्यांची नामावली समृद्ध स्वरूपाची आहे. डॉ. द. भि. कुलकर्णी, कवी ग्रेस, प्रा. वसंत आबाजी डहाके, डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. सुरेश भृगुवार, डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे, डॉ. अरूण वेलणकर, डॉ. दिलीप डबीर, श्री. कृष्णा खोब्रागडे, डॉ. श्रीकांत तिडके, डॉ. रमेश अंधारे, डॉ. राजन जायस्वाल, डॉ. जुल्फी शेख, डॉ. प्रदीप विटाळकर, डॉ. विजय देवगिरीकर,डॉ. मनोज तायडे, डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ.हेमंत खडके, श्री. सुनील शिनखेडे, डॉ. राजेंद्र नाईकवाडे, डॉ. पुरुषोत्तम माळोदे, डॉ. भूषण रामटेके, श्री. गजानन जानभोर, डॉ. देवानंद सोनटक्के, डॉ. अजय देशपांडे आणि आणखीही अनेकानेक विद्यार्थी अशी ही विभागाच्या माजी विद्यार्थ्यांची फार मोठी परंपरा आहे. विभागातील या नावलौकिकप्राप्त विद्यार्थ्यांबरोबरच विभागातून बाहेर पडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी विभागाच्या ज्ञानपरंपरेला आपापल्या पातळ्यांवर आपल्या विवक्षित व्यवसायक्षेत्रांमध्ये जतन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. या विभागातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की, या विद्यार्थ्यांना विभागाने त्यांना दिलेल्या वाङ्मयमूल्यांचे, संस्कारमूल्यांचे व विचारमूल्यांचे सजग असे भान आहे.विभागातून वाङ्मयगुणग्राहक, वाङ्मयसौंदर्यास्वादी विद्यार्थ्यांची पिढी जशी घडली आहे, तसेच विचारमूल्याधिष्ठित, समाजमनस्क, समाजपरिवर्तननिष्ठ विद्यार्थ्यांची पिढी देखील घडली आहे.आंबेडकरवादी जाणीवेच्या विद्यार्थ्यांची पिढी घडवण्यामध्येदेखील विभागाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरलेले आहे.
मागील सहा दशकांपासून विभागाची चालू असलेली वाटचाल अशी वेधक स्वरूपाची आहे. विभागाच्या २५ वर्षांच्या वाटचालीला सुस्पष्ट करणारा मराठी विभागाचा रौप्यमहोत्सव व ५० वर्षांच्या वाटचालीला अधोरेखीत करणारा सुवर्णमहोत्सव यापूर्वी मोठ्या उत्साहात वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानसत्रांसह साजरा करण्यात आला. डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांच्या विभागप्रमुखपदाच्या कालखंडात १९८३ मध्ये विभागाचा रौप्यमहोत्सव थाटात संपन्न केला गेला. नागपूर विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेच्या सहकार्याने साजरा केला गेलेला हा रौप्यमहोत्सव तत्काळी संस्मरणीय स्वरूपाचा ठरला.
डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या विभागप्रमुखपदाच्या कालखंडात विभागाचा सुवर्णमहोत्सव २००८ या वर्षी मोठ्या धुमधडाक्यात व अनेकानेक कार्यक्रमांसह साजरा करण्यात आला. सुवर्णमहोत्सवी वर्षात विभागप्रमुख डॉ. अक्षयकुमार काळे ह्यांच्या अध्यक्षतेखाली स्नातकोत्तर मराठी विभाग सुवर्णमहोत्सव समिती स्थापण्यात आली आणि या समितीच्या सहयोगाने विभागाद्वारे वर्षभर विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्र, कार्यशाळा व कार्यक्रम उत्साहात घेण्यात आले. ‘गांधीवाद आणि मराठी साहित्य’,‘स्त्रीवाद आणि मराठी साहित्य’, ‘संत तुकाराम : व्यक्ती, वाङ्मय आणि कार्य’इत्यादी विविध विषयांवर मराठी विभाग व अन्य महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेले चर्चासत्र संस्मरणीय ठरले.
विभागाद्वारे घेण्यात आलेल्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये व उपक्रमांमध्ये स्नातकोत्तर मराठी विभाग माजी विद्यार्थी संघटनेचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. मराठी विभागाच्या ह्या हीरक महोत्सवाच्या आयोजनामध्ये स्नातकोत्तर मराठी विभाग माजी विद्यार्थी संघटना व हीरक महोत्सव आयोजन समिती यांचे योगदान महत्त्वपूर्ण स्वरूपाचे आहे.
मराठी विभागाने विविध प्रकारचे वाङ्मयीन व अकादमीक उपक्रम सातत्याने राबवले आहेत. चर्चासत्र, कार्यशाळा, परिसंवाद, परिषद, विशेष व्याख्यान इत्यादी विविध उपक्रमांचे विभागाने यशस्वीपणे आयोजन केले आहे. त्यातून शैक्षणिक व वाङ्मयीन वर्तुळात विभागाची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली आहे. ‘गोपाळ गणेश आगरकर स्मृती चर्चासत्रा’पासून तर ‘कोवळी उन्हे’ या वाङ्मयीन-सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत अनेकानेक संस्मरणीय वाङ्मयीन व अकादमीक उपक्रम विभागाने आतापर्यंत घेतले आहेत आणि त्याआधारे विद्यापीठातील शैक्षणिक पर्यावरण सतत नित्यनूतन ठेवले आहे.
विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागाने मराठी भाषा व साहित्याच्या अध्ययन, अध्यापन, लेखन, समीक्षण व संशोधनाच्या क्षेत्रात दिलेले योगदान हे असे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचे आहे. विभागाच्या या वैशिष्ट्यपूर्ण व भरीव योगदानामुळे विभागाला वाङ्मयीन ज्ञानव्यवहाराच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करता आले आहे. विभागाचा हा सहा दशकांचा समृद्ध असा ऐतिहासिक वारसा जतन करणे आणि त्याचे संवर्धन करणे, आणि अलीकडच्या काळातील विविधांगी स्वरूपाच्या आव्हानांवर मात करणे, हे अलीकडच्या काळातील सर्व प्रकारच्यासंक्रमणकाळात विद्यापीठाशी व विभागाशी ऋणानुबंध असलेल्या सर्वांचे सामूहिक कर्तव्य ठरते.
डॉ. शैलेंद्र धर्मदास लेंडे,
प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख,
स्नातकोत्तर मराठी विभाग,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर- ४४००३३
भ्रमणध्वनी – ७०३८७३१५३३
ईमेल –shailendra.rtmnu@gmeil.com
*****